Here are the Useful Popular Articles by Krishi Vigyan Kendra, Akola
हरभरा लागवडीचे सुधारीत तंत्रज्ञान
रबी हंगामात भारतीय कडधान्य शेतीत हरभरा या पिकास खूप महत्व आहे, कारण जगातील एकूण हरभरा पिकापैकी अंदाजे 78 टक्के पीक भारतात घेतले जाते. आपल्या देशातील हरभरा हे रबी हंगामातील प्रमुख कडधान्य पीक आहे. देशातील कडधान्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 50 टक्के क्षेत्र आणि 65 टक्के उत्पादन हरभरा या पीकाचे आहे. महाराष्ट्रामध्ये हरभरा या पिकाखाली सुमारे 8.30 लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 4.66 लाख टन इतके आहे. हरभरा हे हिवाळी ऋतुतील पीक असून या पिकास रात्रीचे आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे 18 ते 26 अंश से. आणि 21 ते 29 अंश से. दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. प्रखर सुर्यप्रकाश असल्यास हे पीक जास्तीत जास्त उत्पादन देते. मंद ढगाळ वातावरणाबरोबर हवेत ओलाव्याचे जास्त प्रमाण असल्यास त्याचा फुलोरा व दाणे भरण्याच्या म्हणजेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अति आद्रता, हिवाळी पाऊस तथा गारपीट यांचा पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम होतो. 6 ते 9 सामू असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत हे चांगले येते. महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यात हिवाळयातील थंडीचे दिवस बरेच कमी असल्यामुळे या पिकाचे दर हेक्टरी उत्पन्न कमी होते. त्याकरीता लवकर तयार होणार्या जाती वापरून त्यांचा फुलो-याचा काळ थंडीचे दिवसांत येर्इल याप्रमाणे पेरणीची योजना केली तर उत्पन्नात लक्षणीय प्रगती होऊ शकते. हरभ-याच्या मुळावरील गाठींमुळे नत्राचे जमीनीत प्रमाण वाढते. हरभ-याच्या टरफलासह दाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 16 ते 19 टक्के असते तर नुसत्या डाळीत 22 ते 25 टक्के असते. हरभ-याच्या कोवळया पानात मॅलिक व ऑक्सालिक आम्ल असते.
हवामान व जमीन
हरभरा करीता मध्यम ते भारी दर्जाची आणि चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. चोपण तसेच आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. हरभर्यासचे भरपूर उत्पन्न येण्याकरीता जमिन ट्रॅक्टरद्वारे किंवा लोखंडी नांगरने नांगरून नंतर वखराच्या 2-3 पाळया देवून भुसभुशीत करावी. खरीप हंगामात इतर पीक घ्यावयाचे नसल्यास शेतात हरभर्यारची पेरणी होर्इपर्यंत तण होणार नाही याची काळजी घ्यावी. खरीप हंगामात मुगाचे -उडीदाचे पीक घेतले असल्यास ते पीक काढल्यानंतर जमीन 2-3 वेळा वखरून भुसभुशीत करावी. हलक्या नांगराची आवश्यकता असल्यास उपयोग करावा.
पेरणीची वेळ
कोरडवाहू परिस्थितीत सप्टेंबर-ऑक्टोबरच्या पावसावर हरभ-याची पेरणी अवलंबून असते. कोरडवाहू हरभ-याचे पीक 10 ऑक्टोबरचे आसपास पेरल्यास सर्वात जास्त उत्पन्न येते. त्याचप्रमाणे ओलिताखालील हरभरा 20 ते 25 ऑक्टोबरचे दरम्यान पेरल्यास चांगले उत्पन्न येते. हरभ-याचा फुलो-याचा काळ थंडीत येर्इल आणि जितका काळ थंडीचा राहील त्याप्रमाणे उत्पादनात वाढ संभवते. या बाबीचा विचार करता पिकाची पेरणी 10 नोव्हेंबरच्या आसपास करणे उपयुक्त असू शकते. हेक्टरी झाडांची संख्या : अधिक उत्पादनाच्या दृष्टीने झाडांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या पिकाकरीता दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. व झाडातील अंतर 10 सें.मी. ठेवावे. याप्रमाणे दर हेक्टरी 3.33 लाख झाडांची संख्या मिळते.
बिजप्रक्रिया :
बियाण्यास थायरम (3 ग्रॅम प्रति किलो) किंवा मर या रोगापासून वाचविण्यासाठी कार्बेन्डॅझिम (2 ग्रॅम प्रति किलो) या बुरशीनाशकाची किंवा ट्रायकोडर्मा (4 ग्रॅम प्रति किलो) बुरशीसंवर्धनाची प्रक्रिया करावी. त्यामुळे रोपावस्थेत मूळकुजव्या रोगामुळे झाडे मरण्याचे प्रमाण कमी होते.
खतांचा वापर :
पेरणीच्या वेळी बियाण्यास रायझोबियम 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास तसेच स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास लावावे.
खताच्या मात्रा हरभरा कोरडवाहू पीक घेण्यासाठी 25 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी, त्याचप्रमाणे 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद ओलीताखालील हरभ-याकरीता पेरणीच्या वेळी द्यावे. भारी जमिनीत नत्रयुक्त खतांचा जास्त वापर किंवा जास्त ओलीत झाल्यास पिकाची शाकीय वाढ भरपूर होते. परंतु भरपूर ओलावा असल्यास पिकाला ते लवकर उपलब्ध होऊ शकतात म्हणून नत्रयुक्त खते मात्रेएवढीच वापरावी.
आंतरमशागत
जमिनीत भेगा पडू नये म्हणून आवश्यकतेप्रमाणे 1 ते 2 कोळपण्या कराव्यात. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार निंदणी करावी. हरभरा पिकात तण असल्यास उत्पन्नात फरक पडतो. हरभरा पिकाला पेरणीपासून पहिली निंदणी 25 दिवसांनी व दुसरी निंदणी 45 दिवसांनी द्यावयाची शिफारस करण्यात आली आहे. पेरणीपासून 45 दिवस तण नियंत्रण महत्वाचे आहे.
तणनाशकाचा वापर
तणनाशकाचा वापर करावयाचा असल्यास पेरणीपूर्व फ्ल्युक्लोरॅलिन (बासालीन 45 टक्के र्इसी) 1.7 ते 2.2 लिटर प्रति हेक्टरी किंवा पेरणी केल्यानंतर 48 तासांच्या आत म्हणजे उगवणपूर्व पेंडीमेथॉलिन (स्टॉम्प 30 टक्के र्इसी) 3 ते 3.5 लिटर प्रति हेक्टरी वापरावे.
ओलीत व्यवस्थापन
ओलिताखाली हरभरा घ्यायचा असल्यास पाण्याच्या दोन पाळया द्याव्यात. पहिली पाळी फुलोर्यावर असतांना आणि दुसरी पाळी घाटे भरतांना दिली असता उत्पन्नात 52 टक्के वाढ होते. त्याचप्रमाणे जर पाणी कमी असेल तर एक पाणी घाटे धरतेवेळी द्यावे.
कापणी व मळणी
शेताच्या सर्व भागातील पीक वाळल्यावर पाने झडतात, म्हणून पीक परिपक्क झाल्याबरोबर कापणी करावी. अन्यथा घाटे जमिनीवर गळून आर्थिक नुकसान होते. कापणी जमीनीलगत कापून केल्यास नत्राच्या गाठी असलेल्या मुळया जमीनीत राहून त्यातील नत्राचा पुढील पीकास उपयोग होतो. कापणीपश्चात उन्हात 8 ते 10 दिवस वाळविल्यावर काठीने झोडपून अगर बैलांचे सहाय्याने मळणी करावी. त्यानंतर उफनणी करून बी अलग करावे. यासाठी मळणी यंत्राचा किंवा कापणी-मळणी एकत्र करणा-या यंत्राचा वापर उपयुक्त ठरतो.