Weekly Advice

Here are the Weekly Advice published in Weekly Krishak Jagar by Deshonnati Newspaper

june, 2016

पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
• वांगी पिकावरील पांढरया माशीच्या व्यवस्थापनाकरीता एकरी 10 ते 12 पिवळे चिकट सापळे लावावेत. किडीचे प्रमाण जास्त असल्यास डायफेंथियुरॉन 12 ग्रॅम किंवा थायमेथोक्झाम 25 डब्ल्यू जी. 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • वांगी पिकावर शेंडे आणि फळ पोखरणारया अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. कीडग्रस्त शेंडे दर आठवडयाला खुडून टाकावेत आणि नष्ट करावेत. तोडणीचे वेळी कीडग्रस्त फळे गोळा करुन जमिनीत गाडून टाकावीत तसेच अळीच्या व्यवस्थापनाकरीता क्लोरपायारीफॉस 20 इ.सी. 20 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 एस.जी. 4 ग्रॅम किंवा क्लोरॅंट्रॅनिलिप्रोल 18.5 एस.सी. 4 मिली किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रिन 8 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार अधून मधून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. • भेंडी पिकावर रस शोषण करणारया किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास अझाडिरॅक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अॅसेटामिप्रिड 20 एस.पी. 1.5 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48 एफ.एस. 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • पहिला पाऊस पडताच कडूनिंबाच्या झाडाखाली भरपूर निंबोळया पडलेल्या दिसतील. निंबोळया जमा करुन स्वच्छ करुन वाळवून ठेवाव्या. खरीप हंगामातील किडींच्या व्यवस्थापनाकरीता निंबोळी अर्क तयार करण्याकरीता त्याचा उपयोग होईल.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
जनावरांची पावसाळयापूर्वी काळजी • जनावरांना पावसाळा सुरू होण्यापुर्वी जंत निर्मुलन करून घ्या, शक्यतोवर गाभण जनावरांना जंत निर्मुलन करू नका जर करायचे असल्यास मोठया जनावरांना फेबेन्डेझोल 3 ग्रॅम व लहान जनावरे, वासरे, शेळया यांना 150 मि.ग्रॅ. ते 300 मि.ग्रॅ. द्यावे. इतर जनावरांना अलबेन्डाझोल 3 ग्रॅम किंवा आयव्हरमेक्टीन 10 ग्रॅमच्या मात्रेची गोळी द्यावी. आयव्हरमेक्टीनमुळे शरीरातील व शरीरावरील जंत निर्मुलन होतात. • पावसाळयापुर्वी जनावरांचे गोठे साफ व स्वच्छ ठेवावे. गोठयात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. टिन तुटले किंवा निघाले असतील तर दुरूस्त करून घ्यावेत. गोठयात जास्त पाण्याचा शिरकाव होण्याची शक्यता असल्यास गोणपाट किंवा प्लास्टिक कापडाची व्यवस्था करून ठेवावी, तसेच गोठयामध्ये चुना व मुरूम टाकुन द्यावा. • पावसाळयापुर्वी जनावरांचे पाण्याचे हौद स्वच्छ करून घ्यावे त्यामध्ये शेवाळ असल्यास शेवाळ काढुन संपूर्ण हौद घासुन घेवून आतमध्ये चुना लावून घ्यावा. चुना लावल्यामध्ये हौदामध्ये शेवाळाचे प्रमाण कमी होईल, तसेच पावसाचे वाहते पाणी हौदात जाणार नाही यासाठी उपाययोजना करून घ्याव्या. हौदाच्या आजुबाजुला चिखल होणार नाही यासाठी जेथे पाणी साचत असेल अशा ठिकाणी मुरून टाकून घ्यावा व पाणी वाहत जाईल असा उतार काढुन घ्यावा. • पावसाळयापूर्वी जनावरांचे अंगावरील तसेच गोठयातील परजीवी जंत, गोचिड यांचे निर्मुलन करून घ्या. त्यासाठी सायपरमेथ्रीन किंवा अमीट्राज औषध 1 लिटर पाण्यात 5 मिली मिसळून जनावरांच्या अंगावर फवारावे व हेच मिश्रण गोठयामध्ये सर्व ठिकाणी फवारावे. जनावरांच्या अंगावर औषध फवारत असतांना जनावर औषध चाटणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच खाद्यावर व पिण्याच्या पाण्यावर औषध फवारले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे. • जनावरांना घटसर्प व एकटांग्या या रोगाची लस द्यावी. ही लस सर्व पशुचिकीत्सालयामध्ये उपलब्ध असते. यासोबतच औषधी दुकानामध्ये घटसर्प, एकटांग्या व तोंडखुरी पायखुरी यांची एकत्रित लस उपलब्ध आहे. ही लस जनावरांना 3 मिलि द्यावी. • पावसाळयामध्ये विणा-या दुधाळ जनावरांना चांगला व सकस आहार द्यावा. ज्या गाई - म्हशी जुलै महिण्यात विनाऱ्या गाई - म्हशीला 1.5 किलो सकस आहार (ढेप/चुरी/खनिज मिश्रण) द्यावे त्यामुळे पोटातील गर्भाची वाढ चांगली होईल व सकस आहारामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढेल व पुढील वेतातील दुध उत्पादन चांगले राहील. • जी जनावरे दुधामध्ये आहेत व गाभण आहेत व गाभणकाळ 7 महिण्याच्यावर झाला आहे अशा जनावरांची दुध उत्पादन/दुध काढणे बंद करावे, दुध बंद करण्यापुर्वी सडांमध्ये प्रतिजैविक औषधी सोडावी. • पावसाळयाच्या मध्य काळापासून जनावरांचा मुख्यत म्हशींचा प्रजनन काळ सुरू होतो त्यासाठी भाकड म्हशींना रोज खनीज मिश्रण 50 ग्रॅम द्यावे जेणेकरून जनावरांचे गर्भाशय व प्रजननेंद्रीय सक्रिय राहील व म्हशी लवकर गाभण राहतील. तसेच प्रजननासाठी उपयुक्त वळुंना या काळात जंत निर्मुलन करून लसीकरण करून घ्यावे व अतिरिक्त खुराक सुरू करावा. यामध्ये 2 किलो ढेप/चुरी व खनिज मिश्रण आवश्यकता असल्यास विटामीन A व सेलेनियमचे इंजक्शन द्यावे ज्यामुळे वळुचा जोम टिकुन राहतो. • सध्या वातावरणामध्ये बदल होत असल्यामुळे जनावरांना वातावरणाप्रमाणे थंड ठिकाणी ठेवावे तसेच या महिण्यात ढगाळ वातावरण, वीज चमकणे व वीज पडण्याचे प्रमाण जास्त राहू शकते त्यासाठी जनावरांना अशा वातावरणात बाहेर चरावयास सोडु नये • अचानक आलेला पाउस सुखवह असला तरी लहान वासरे व लहान करडे यांची या वेळेस योग्य निगा घ्यावी. तसेच वासरे जास्त ओलसर राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• पूर्व मान्सून कपाशीला वरचेवर पाणी देत राहावे. • बियाणे खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे. बिलावर प्लॉट नंबर, कंपनी, वाण हे अवश्य लिहून घ्यावे. • सोयाबीनच्या पेरणीकरिता कमी कालावधीचे जे. एस. – ९५६० हे वाण वापरावे. शेंगा न फुटणारे जे.एस. – ९३०३ हे वाण वापरावे. • तूर पिकाच्या पी.के.व्ही. तारा, बि.एस.एम.आर. – ७३६, बि.डी.एन. – ७११, आशा या वाणांची पेरणी करावी. • कोरडवाहू तुरी करिता कमी कालावधीचे ए.के.टी. – ८८११ हे वाण निवडावे. • मुगाचे पी.के.व्ही. ग्रीन गोल्ड, बि.एम. – २००३ -२ यापैकी वाण निवडावे. • उडीदाचे एकाच वेळी परिपक्व होणारे ए.के.यु. – १५ हे वाण निवडावे. • ३ ते ४ इंच (७५ – १०० मी.मी.) पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. • पेरणी करतांना उताराला आडवी पेरणी करावी.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
फळझाडे:- • संत्रा पिकामध्ये सध्या आंबिया बहाराची फळे असतील. ती टिकून राहण्यासाठी बागेला पाणी देणे सुरू ठेवावे. गरजेनुसार 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या सुरू ठेवाव्यात. • झाडाभोवती काळ्या पॉलिथीनचे (100 मायक्रॉन जाडी) आच्छादन पसरावे किंवा गवत, गव्हांडा याचा थर झाडाच्या सभोवताली पसरून घ्यावा. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होईल. • नवीन बाग लागवडीकरिता 75 x 75 x 75 सेंटिमीटर आकाराचे खड्डे खोदावे. नागपुरी संत्राकरिता 6 x 6 मीटर अंतर ठेवावे. खोदलेले खड्डे सूर्याच्या उष्णतेकरिता उघडे ठेवावे. या ह्प्त्यात खड्डे भरणे सुरु करावे, खड्डे भरतांना तळाशी वाळलेला पालापाचोळा टाकावा त्यानंतर शेणखत, माती व १ ते १.५ किलो सुपर फोस्फेट प्रती खड्डा या प्रमाणे खड्डा भरावा. • फळबाग लागवडीसाठी लागणाऱ्या कलमांचे व विशिष्ट वाणांची उपलब्धता कुठे होईल याचे नियोजन करून घ्यावे. कलमा किंवा रोपे कृषी विद्यापीठ, शासकीय रोप वाटिका तसेच कृषी विज्ञान केंद्र येथून खरेदी करावे. • संत्रा पिकाला सद्या मृग बहारासाठी ताण दिलेला असेल व ताणाच्या कालावधीत पाऊस आला असेल तर लीवोसीनची फवारणी घ्यावी. • मृग बहारासाठी दिलेला ताण सोडावा. ताण सोडताना प्रथम हलके पाणी द्यावे व ४ ते ५ दिवसानंतर परत पाणी द्यावे. • संत्रा मध्ये फळगळ कमी करण्याकरिता 2, 4 - डी हे 1.5 ग्रॅम किंवा जिबरेलीक आम्ल 1.5 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) 100 ग्रॅम अधिक युरिया 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • नवीन मृगबाग केळी लागवडीकरिता पूर्व नियोजन व तयारी करावी. केळीसाठी उतिसंवर्धित रोपांची निवड करावी. लागवड १.५ बाय १.५ मीटर अंतरावर करावी. • केळी पिकासाठी उतिसंवर्धित रोपे खात्रीशीर व मान्यताप्राप्त ठिकाणाहूनच खरेदी करावी. हळद व आद्रक :- • हळद व आद्रक पिकाच्या लागवडीसाठी रुंद वरंबे तयार करावे. त्या पूर्वी जमिनीमधील लव्हाळा, हराळी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत, तसेच अगोदरच्या पिकाच्या काश्या वेचून घ्याव्यात. त्यानंतर कुळवाच्या गरजेप्रमाणे एक ते दोन पाळ्या देऊन शेवटच्या पाळीअगोदर एकरी दहा टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. सध्याच्या काळात शेणखताची मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेणखताबरोबर इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा • जमीन तयार करतेवेळी एकरी २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा द्यावी. • बेणे जातिवंत असावे. हळदीसाठी पिडीकेव्ही वायगाव, सेलम, फुले स्वरूपा, आणी आद्रकासाठी माहीम जातींची निवड करावी. • बियाण्याची सुप्तावस्था संपलेली असावी. दीड ते दोन महिने बेण्याची काढणीनंतर सावलीत साठवणूक केलेले असावे. • लागवडीसाठी मातृकंद किवा जेठेगड्डे चा वापर करावा. मातृकंद किंवा जेठा गड्डे बेणे - या प्रकारचे बेणे हे मुख्य रोपाच्या खाली जे कंद तयार होतात त्यास मातृकंद म्हणतात. याचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी १० ते ११ क्विंटल बेणे लागते. मातृकंदापासून मिळणारे उत्पन्न हे हळकुंडापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा १५ ते २० टक्के जास्त असते. • हळद लागवडीच्या पूर्वी १५ दिवस बियाणे साठवलेल्या ढिगावर पाणी मारावे, जेणेकरून ढिगामधील आर्द्रता वाढून बियाण्याची सुप्तावस्था संपून अंकुरण सुरू होते. पाणी मारल्यानंतर एक आठवड्याने बियाण्याच्या मुळ्या साफ करून बियाणे लागवडीस तयार करावे. भाजीपाला आणी फुलपिके:- • गादीवाफ्यावरील मिरची, वांगे, फुलकोबी, टोमाटो रोपांची काळजी घ्यावी. रोपांचे रस शोसनाऱ्या किडींपासून व्यवस्थापन करावे. • खरीप भेंडीसाठी अकोला बहार, परभणी क्रांती या वाणांची लागवडीसाठी निवड करावी व लागवडीकरिता एकरी ४ किलो बियाणे वापरावे. • वाल, चवळी, गवार, काकडी, कारली, ढेमसे, दुधी भोपळा, कोहळा, शिरी दोडका, चोपडा दोडका यांची पेरणी चांगला पाऊस आल्यानंतर करावी. • कांदा चाळीमध्ये कांदा साठवला असेल तर त्या कांद्याला अधून मधून खाली वर करावे. • निशिगंधाचे २० ते ३० ग्राम वजनाचे कंद २० बाय २० सेमी अंतरावर सपाट वाफ्यात लावावेत.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• पुरेसा पाऊस आल्याशिवाय (७० मी.मी. पेक्षा जास्त) पेरणी करू नये. पावसाचा अंदाज व वेळ पाहून पिकांचे नियोजन करावे. • सर्व दाळ वर्गीय पिकांना कार्बेन्डीझम ३ ग्राम प्रति किलो बियाण्यास लावावे. • मुगाचे बि.एम. २००३ – २, पी.के.व्ही. ग्रीन गोल्ड हे वाण वापरावे. • उडीदाचे ए.के.यु. – १५, टी.ए.यु. – २ यापैकी एक वाण वापरावे. ज्या शेतात मागील तीन वर्षापासून सोयाबीनचे उत्पन्न कमी येत असल्यास त्या ठिकाणी सोयाबीन ऐवजी उडीद या पिकाची लागवड करावी. • सोयाबीनचे जे.एस. – ३३५, जे.एस. – ९५६०, जे.एस. – ९३०५ हे वाण वापरावे. कम्बाईन हार्वेस्टरने सोयाबीनची काढणी करावयाची असल्यास एम.ए.यु.एस. – १६२ हे वाण वापरावे. या वाणाच्या शेंगा जमिनीपासून ३ ते ४ इंच वर पासून लागतात. • सोयाबीनला पेरणीच्या वेळेस प्रति किलो बियाण्यास २५ ग्राम रायझोबियम जापोनिकाम व २५ ग्राम पि.एस.बि. लावावे. • तूर, मुग व उडीद यांच्या पेरणीच्या वेळेस प्रति किलो बियाण्यास २५ ग्राम रायझोबियम सायसेरी व २५ ग्राम पि.एस. बि. लावावे. • तुरीचे पी.के.व्ही. – तारा, बि.एस.एम.आर. – ७३६ व आशा यापैकी एक वाण पेरणीकरिता निवडावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
हळद : • हळदीमध्ये उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने जीवाणू संवर्धकाची बेणेप्रक्रिया करावी. यामध्ये अझोस्पिरीलीयम, स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक (पीएसबी), पोटॅश विरघळणारे जीवाणू संवर्धक प्रत्येकी पाच ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया कररून लगेच लागवड करावी. • रासायनिक व जैविक दोन्ही बीजप्रक्रिया करावयाच्या झाल्यास प्रथम रासायनिक प्रक्रिया करून बेणे सावलीमध्ये ठेवावे. लागवड करताना जैविक बेणेप्रक्रिया करून लागवड करावी. • लागवड झाल्यावर दुसऱ्या किवा तिसऱ्या दिवशी तन व्यवस्थापनासाठी अटराझिन ४ ते ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • लागवडीच्या पूर्वी खते वरंब्यात मिसळतांना सुपर फोस्फेट एकरी २५० किलो + मुरेट ऑफ पोटाश ७५ किलो द्यावे. संत्रा/मोसंबी : • लिंबूवर्गीय फळपिकात जून महिन्यात मृगाचा पाऊस पडल्यानंतर (ताण तोडतेवेळी) प्रतिझाडास ६०० ग्रॅम नत्र (१२० ग्रॅम युरिया) अधिक ४०० ग्रॅम स्फुरद (२.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) अधिक ४०० ग्रॅम पालाश (७०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) खतमात्रा द्यावी. • फळझाडांच्या खोडाला जमिनीपासून १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो मलम लावावा. • नवीन फळबाग लागवडीसाठी खड्डे खत + माती + सुपर फोस्फेटने भरावेत. कलमे शासकीय रोपवाटिका/कृषी विद्यापीठ/कृषी विज्ञान केंद्र रोपवाटिकेतून खरेदी करावी. • मृग बहारासाठी दिलेला ताण सोडवावा. झाडांना वयानुसार शिफारशीत खताच्या मात्रा द्याव्या. लिंबू:- • हस्त बहार व्यवस्थापनासाठी जि.ए. ५ ग्राम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • फळझाडांच्या खोडाला जमिनीपासून १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो मलम लावावा • नवीन फळबाग लागवडीसाठी खड्डे खत + माती + सुपर फोस्फेटने भरावेत. कलमे शासकीय रोपवाटिका/कृषी विद्यापीठ/कृषी विज्ञान केंद्र रोपवाटिकेतून खरेदी करावी. डाळिंब : • डाळिंब पिकावर या काळात होणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी पिकातील रोगग्रस्त अवशेषांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. बागेतील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. फूलशेती : • गलांडा फुलपिकाच्या अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम (सामू ५-८) जमीन निवडावी. पाण्याचा निचरा न होणाऱ्या, खारवट चोपण जमिनीत लागवड करू नये. भाजीपाला : • खरीप हंगामात वांगी, मिरची, टोमॅटो या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्यावर बी पेरून रोपे तयार करावीत.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
सध्याच्या स्थितीमध्ये उन्हाळा संपत आला असला तरी उन्हाची तीव्रता अजूनपर्यंत कमी झाली नाही तसेच बऱ्याच ठिकाणी थोडाफार पाउस येऊन गेल्यामुळे थोडी हवेतील आद्रता वाढली आहे. उन, वाढलेले तापमान व आद्रता यामुळे जनावरांना त्यांचे शारीरिक तापमान स्थिर ठेवणे कठीण होत आहे व अश्या प्रकारचे वातावरण गाभण जनावरांसाठी खूप घातक आहे अश्या वातावरणात गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. खालील उपाय योजना केल्यास जनावरांचा ताण कमी होईल. • जनावरांना मुबलक स्वच्छ व थंड पाणी द्यावे. • गोठा थंड ठेवावा, योग्य आहार द्यावा. • सर्वसाधारण प्रतिदिनी गाईस 35 ते 40 लिटर, म्हशीस 50 ते 60 लिटर पाण्याची आवश्यकता असते. • दुधाळू जनावरास एक लिटर दूध उत्पादनामागे तीन लिटर जादा पाणी उपलब्ध करावे. • दिवसातून एक ते दोन वेळा पाणी पाजण्याऐवजी चार ते पाच वेळा पाणी पाजावे. • पाणी थंड राहण्यासाठी रांजण व बर्फाचा उपयोग करावा. • जनावरांना गुळाचे पाणी पाजल्यास जनावरांच्या पोटात गारवा तयार होऊन शर्करायुक्त पदार्थाचा पुरवठा होतो. • गोठ्यामध्ये पंखे, कुलर अथवा बाहेरील गरम हवा आत येऊ नये म्हणून खिडक्यां ना पोते लावून त्यावर पाणी फवारावे. • गोठा हवेशीर असावा. सूर्यप्रकाश सरळ गोठ्यात येऊ नये. • रोज थंड पाण्याने अंघोळ घालावी. गोठ्याच्या बाजूने झाडे अथवा हिरवळ असावी. • चारा, कुट्टी करून शक्य.तो रात्री किंवा सकाळी द्यावी. • दुपारच्या वेळी हिरवी वैरण खाण्यास द्यावी. • आहारातील खनिज व जीवनसत्त्व मिश्रणाचे प्रमाण वाढवावे. • कोरड्या चाऱ्याचे प्रमाण कमी करावे आणि त्यात मिठाचे पाणी शिंपडावे. • जनावरे सकाळ - संध्याकाळी चरण्यास सोडावीत. • अंबोण चांगले भरडलेले आणि भिजवलेले असावे. त्यामुळे पचनीयता व खाण्याची प्रक्रिया वाढते. • जनावरांच्या खुराकात ज्वारी व मका कमी करावी. कारण यात उष्णतेचे अन्नघटक जास्त असल्याने जनावराच्या शरीरात उष्णता निर्माण करतात. • मूग, तूर, मसूर, हरभरा, हुलगा इत्यादी प्रथिनयुक्त अन्नघटकांचे प्रमाण वाढवावे.